Cart

No products in the cart.

सद्य : स्थितीत गीता धर्माची आवश्यकता

 

गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता ।

पडता रडता घेई उचलूनि कडे वरी ।।

आचार्य विनोबाजी भावे यांनी म्हटल्या प्रमाणे गीता आपल्याला नेहमीच सावरत असते, म्हणूनच आजही ह्या गीता धर्माची समाजाला नितांत आवश्यकता आहे. गीतेची शिकवण म्हणजेच गीता – धर्म होय. काय आहे हा धर्म ?

“श्रीमद्‌भगवद्‌गीता” हा भारतीय संस्कृतीतील सर्व श्रेष्ठ असा ग्रंथ आहे या ग्रंथात सद्यःस्थितीतील समस्यांचे अचूक मार्गदर्शन आढळून येते. “गीता’ महाभारतांतील “”भीमपर्वांत” सांगितली आहे. महाभारतात संघर्षच आढळून येतो. आपले जीवनसुध्दा संघर्षमयच आहे. जीवनांत अनेक समस्यांना तोंड देत देत सामोरे जावे लागते. कुठे व्यक्तिगत मानपानाच्या समस्या , तर कोठे सामाजिक, नैतिक, आर्थिक, राजकिय अशा अनेक समस्यांची मालिकांच जीवनांत सदैव निर्माण होत असते.

महाभारतांत करूवंशांतील भाऊबंदकीचे पर्यावसान कुरूक्षेत्रांतील महायुध्दांत झाले. द्यूतांत कौरवांनी कपटीपणाने पांडवांना हरविले. त्या खेळांतील अटीनुसार 12 वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास संपवून, पांडव परतले आणि ठरल्यानुसार अर्धेराज्य परत मागितले. परंतु उन्मत्त कौरवांनी ते देण्यास नकार दिला. “”श्रीकृष्ण शिष्टाई” झाली. पण ती सुध्दा फलद्रुप होऊ शकली नाही. पहा प्रत्यक्ष श्रीकृष्णाची मध्यस्थी आणि कमीत कमी मागणी, म्हणजे निदान पांच पांडवांना पांच गांवे पण नाही. . . अधर्मानेच वागणाऱ्या दुर्योधनाने ती मागणी तर फेटाळलीच पण तो उद्दामपणे म्हणाला, पाच गांवचे काय? पण सुईच्या अग्रावर मावेल एवढी भूमी सुध्दा आम्ही देणार नाही आणि जर पांडवांना आपले राज्यच हवे असेल तर. . .  त्यांना आमच्याशी युध्द करूनच घ्यावे लागेल! आणि म्हणूनच आता युध्दाला तोंड फुटले होते. त्या धर्मक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूक्षेत्रावर दोन्हीपक्षा कडून युध्दाची जमवा जमव सुरू झाली होती.

चर्मचक्षूने व मनाने सुध्दा आंधळा असलेला राजा धृतराष्ट्र, ज्यांना आपले सारसर्वस्व समजतो असे आपले पुत्र कौरव आणि ज्यांना शत्रु समजतो अशा पाडंवांची त्या युध्दभूमीवर जमवा-जमव सुरू होती. धृतराष्ट्र ज्यांना आपले समजतो त्यांत प्रामुख्याने, मानी व लोभी दुर्योधन, अविचारी व कामुक असा. दुःशासन व कपटी शकुनीमामा एकीकडे तर दुसरीकडे, धर्माचा पक्ष घेणारे म्हणजेच धर्माने वागणारे, धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल व सहदेव हे होते. एकीकडे दैवी संपत्ती, तर दुसरीकडे आसुरी संपत्ती. अशा प्रकारे धर्म व अधर्मातील, सत्य व असत्यंातील युद्ध होते. अशा या दोन पक्षांतील वीरांची जमवा-जमव सुरू होती.

अशा या पार्श्वभूमीवर, ज्याच्या अगांत वीरश्री संचारली आहे, असा पार्थ, एका दैवी रथावर आरूढ होऊन त्या कुरूक्षेत्रांवर प्रवेश करता झाला. त्या दैवी रथावर कपीध्वज असून त्यांचे सारथ्व स्वत: श्रीकृष्ण करत होते. अर्जुनाचे हातांत त्याचा अत्यंत प्रिय असे गांडीव धनुष्य होते आणि तेच धनुष्य उभारून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला , . . . .

अच्युता ! माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी म्हणजे वेदीवर उभा कर. म्हणजे मी पाहीन कोण माझ्या कडून लढत आहेत व कोण विरोधी पक्षांत सामील झालेले आहेंत ? तेव्हा श्रीकृष्णाने रथ नेमका अशाच ठिकाणी उभा केला, की ज्या ठिकाणी भीष्माचार्य, गुरुवर्य द्रोणाचार्य, व कृपाचार्य उभे होते. आपल्या प्रीय तातश्रींना पाहून तसेच गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य व दोन्ही सैन्यांतील आपलेंच चुलते, चुलत भाऊ, मामे भाऊ, मुलगे, नातू व विशेषत: आपल्यावर अत्यंत प्रेम करणारे पीतामह भीष्म, गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य या सर्वांना पाहून, अर्जुन पराकाष्टेच्या करूणेने अत्यंत विषण्ण झाला व तो म्हणाला, “”कृष्णा माझी सर्व गात्रे गलीत झालेली असून तोंडाला कोरडं पडलेली आहे. माझ्या शरीराला कंप फुटू लागला आहे. माझे चित्त भ्रमल्यासारखे झाले आहे.” त्याचे हातून तो गांडीव धनुष्य गळून पडला. त्याने श्रीकृष्णाला निक्षून सांगितले की, “”कृष्णा मला सर्वत्र अपशकुन दिसत आहे. हे युध्द आम्ही जिंकू अथवा हरूं, पण मला मात्र येथे कुलक्षय होईल, कुलधर्म नाहीसा होईल, व्यभिचार माजेल असेंच चित्र दिसत आहे. या सर्व पातकाला मीच जबाबदार धरला जाईन. हे सर्व पाप माझेच माथी येणार. तेंव्हा हे युध्द मला नको आहे. मला त्रिभुवनाचे राज्य मिळाले तरी ते नकोसे वाटत आहे. तेथे हे खांडवप्रस्थ म्हणजे काहीच नाही. हे युध्द करण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा.” असे म्हणून त्याने बसकण मारली.

अशा प्रकारे अर्जुनाच्या अंत:करणांत गडद अंधार पसरला. त्याला मोहाने ग्रासले होते. आपल्या लाडक्या पीतामहावर व गुरूजनांवर बाण मारून त्यांचा संहार करण्याच्या मन:स्थितीत तो नव्हता. त्याच्या मनांतील हा अंधकार व स्वधर्माचा अनादर दूर करण्याकरिता, श्रीकृष्णाने जो आदेश अर्जुनाला केला तीच “”श्रीमद्‌भगवद्‌ गीता” होय आणि तोच गीता – धर्म होय.

अर्जुनाच्या या आसक्तिलाच क्लैब्ध म्हटले आहे. असा हा अंत:करणाचा दुबळेपणा व मोह यांनी अर्जुनाला ग्रासले होते. अर्जुन आपला स्वधर्मच विसरला होता. खरे तर तो कौरवांचे सैन्य पाहून घाबरलेला नव्हता. यापूर्वी उत्तर गोग्रहणाचे वेळी बृहन्नलेच्या रुपांत त्याने भीष्मचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या सर्वांना एकटयानेच सळोकी पळो करून सोडले होते. पण यथे तो केवळ मोहांत पडला होता. त्यामुळेच तो आपला स्वधर्म काय? येथे येण्याचे उद्दीष्ट काय ? हे सारे – सारे विसरला होता.

ज्ञानदेव म्हणतात, या “अर्जुनाला मोहरूपी सर्पाने दंश केला होता, ते वीष त्यांच्या अंगांत भिनले होते. त्यांच वेळी भगवान श्रीकृष्ण, एखाद्या गारूडया प्रमाणे तेथे आलेत व गीतारूपी बीन वाजवून या मोहरूपी विषावर जालीम उपाय केला. त्याचा मोह नाहीसा केला. हाच गीता-धर्म असून तो अनादी काळापासून अशा मोहापासून सदैव समाजाला सावरत आलेला आहे.

प्रत्येकालाच जन्मता ऐक स्वधर्म प्राप्त होत असतो तो मातेसमान असतो. कारण माता आपल्याला ठरविण्याचा अधिकार नाही ती कशी का असेना, जन्मापूर्वीच ठरलेली असते. तसाच हा स्वधर्म आपल्याला ठरविण्याचा अधिकार नसतो. तो मातेसारखाच आपल्या जन्माची वाट पाहत तिष्ठत उभा असतो. जन्म होताच तो आपल्याला प्राप्त होतो या आपल्या प्राप्त झालेल्या स्वधर्मानुसार सर्व कर्मेघडत असतात. तो सतत कर्मरत असतो. म्हणून कर्मत्याग शक्यच नाही. क्षणभरही आपण कर्म केल्या शिवाय राहू शकते नाही. म्हणून गीतेने कार्यफल त्याग सांगितला आहे.

 

कर्मण्येवाधीकारस्ते मां फलेषु कदाचन्‌ ।

मा कर्म फल हेतूर्भूमा ते संङ्गोऽ स्त्य कर्माणि ।।

 

त्याचप्रमाणे गीतेचा दुसरा महत्वाचा सिध्दांत म्हणजे, स्वधर्मानुसार कर्म करण्यांतच जन्माचे सार्थक आहे . दुसऱ्याचा म्हणजे परधर्म कितीही आक र्षक वाटला, सुखावह वाटला तरी तो भयावहच असतो.

श्रेयान्सधर्मी विगुण परधर्मत्स्वनुष्ठितात्‌ ।

स्वधर्म निधनं श्रेय: परधर्म भयावह: (गीता 3: 35)

 

त्यांच प्रमाणे गीतेतील सांख्ययोग, राजगुहय अंसा राजये आत्मसंयम योग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. एवढेच नव्हे तर त्याला विश्वरूपी दर्शन सुध्दा घडविले. या सर्वांचा उद्‌देश एकच की अर्जुनाला स्वधर्माची आठवण करून द्यावी. कारण मनुष्याच्या ठिकाणी असे आसक्ती, वासना व इच्छा केव्हा वर उफाळून येतील व त्याला स्वधर्मापासून दूर नेतील हें सांगता येत नाही. म्हणून भगवंतांनी येथे स्वधर्माची महती सांगून अर्जुनाला युध्दा करीता प्रवृत्त केले. असा मोह नष्ट झाल्याची अर्जुन गीतेच्या शेवटच्या अध्यायांत स्पष्ट कबूली देतो.

 

नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वतप्रसादान मंयाडच्युत ।

स्थितो  स्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव।।

 

वरील सर्व विवेचना वरुन हेच स्पष्ट होते की जो संघर्ष करण्यास भगवंताने अर्जुनास तयार केले, तो संघर्ष केवळ अर्जुनाचा एकटयाचा नव्हता तर सत्य – आकांक्षा व आसक्ती यांतील होता. असा आसक्ती व अनासक्तीचा संघर्ष आज सुध्दा सुरु आहे. आणि म्हणूनच तुमचा माझा असा सर्वांचा आहे तसेच ज्यांना ज्यांना सत्याची चाड आहे त्या विश्र्वातील सर्व सहृदयी जनांच आहे.  अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करुन आपल्या सर्वांकरीतांच ही गीता सांगितली आहे. यास्तव गीतेचा व आपला संबंध घनिष्ठ आहे हा संबंध लक्षात घेऊन जर आपण गीता – धर्माचे अनुशिलन केले तर आज सुध्दा गीता आपले जीवनांत आतोनात चमत्कार घडवू शकते.  पंरतु त्यासाठी आपल्याला  अर्जुन व्हावे लागेल कसा होता अर्जुन?

          अर्जुनाचे ठिकाणी अृजुता होती.  म्हणजेच तो सरळ मनाचा होता निस्पृहता त्याचे ठिकाणी होती, म्हणजेच त्यांला कोणत्याच गोष्टीचा हव्यास नव्हता.  इच्छा नव्हती. भगवतांचे ठायी नितांत श्रध्दा होती.  कारण भगवंतानीच सांगून ठेवले आहे.  “श्रध्दावॉं लभते ज्ञान।’  त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तो भगवत्‌ शरणागत होता.  आपल्याला सुध्दा अर्जुना सारखेच अनन्य गतीक व्हावे लागेल.  कारण अर्जुना प्रमाणेच आपल्या मनात व जीवनात सतत संघर्ष सुरुच आहे. अंतःकरण हेच कुरुक्षेत्र असून तेथेच कौरच – पांडवांचे युध्द सुरु आहे म्हणजे तेथेच दैवी संपत्ती व आसूरी संपत्ती यात सतत संघर्ष सुरु आहे.  चांगल्या वाईट बाबतची दोलायमान स्थिती म्हणजेच संघर्ष होय.  हा संघर्ष जसा आत सुरु आहे.  तसाच तो बाहेर सुध्दा सुरु असतो.  पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, बाहेरील संघर्ष सुरु असताना मनातील संघर्ष थांबणे गरजेचे आहे.  हा मनातील संघर्ष थांबविण्याचे कार्य केवळ गीता – धर्मच करु शकतो बाहेरील संघर्ष आपल्या हातात नाही. त्यामुळे तो पूर्णपणे थांबवता येणार नाही तरी पण आपण आपले बाजूने संघर्ष थांबवू शकतो.  समोरच्याला खुुशाल संघर्ष करु दया.  पण मी माझे बाजूने संघर्ष करणार नाही.  हा निश्चय केला तरच आपण समाधानाचे व शांतीपूर्ण जीवन जगू शकू समाधान ही बाजारात मिळणारी वस्तु नाही ती चितांची अवस्था असून ती प्राप्त करण्याकरीता तुकोबा सांगतात,

 

” ठेविले अनंत तैसेचि रहावे।

चित्ती असू द्यावे समाधान।।

 

खरे तर प्रत्येक व्यक्तीची शांततापूर्वक जीवनच जगण्याची इच्छा असते. पण जीवनांत हा संघर्ष पदोपदी आढळतो जसा तो व्यक्तिगत जीवनांत असतो तसाच तो कुटूंब, समाज, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर दिसतो. तो आम्ही टाळू शकत नाही. कितीही आदर्शाच्या गप्पा मारल्या तरी तो अटळ असून अगदी पती – पत्नी, बहीण -भाऊ, आई -वडील, मुलें-मुली व इतर नातलगांशी एवढेच नव्हे तर शेजारी – पाजारी, व्यवसाय- धंद्यातील सहकारी व प्रतिस्पर्धी या सर्वच संबंधात कुठे ना कुठे तरी सुरु असतो हे सर्व गृहीत धरुन शांततामय जीवन कसे जगावे हेच गीता धर्म शिकवतो.

आसपासचे वातावरण आपण बदलू शकत नाही. तेव्हा वास्तवाचा स्विकार करणे एवढेच आपले हाती असते, तोच खरा पुरुषार्थ होय.  हाच गीता-धर्म होय, गीता सांगते आपण सृष्टी बदलू शकत नाही पण दृष्टी बदलणे आपल्या हातात आहे ही नवी दृष्टी आपल्याला गीता – धर्म देतो.  दृष्टी बदलली की सृष्टी आपोआप बदलते.  मनाची दशा बदलली की दिशा आपोआप बदलतात. किंबहूना मनाची दशा बदलली की दिशा बदलण्याची गरजच उरत नाही व तशीही ती आपण बदलूच शकत नाही.

आपल्या मनांतच युध्द सुरु आहे तेव्हा ते थांबवणे अधीक गरजेचे आहे.  मनाचे मुख्य कार्य संकल्प – विकल्प करणे हे असून तेच चक्र थांबले की मन एकदम ताब्यात येते.  गीतेचा हाच सिध्दांत आहे.  मनामुळेच सुख – दुःख हया भावना निर्माण होतात. म्हणून प्रथमतः तेच ताब्यात घ्या असे समर्थ सुध्दा सांगतात. त्या करीतांच त्यांनी 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत अन्यथा तनाचे श्लोक लिहीले असते म्हणूनच तुकोबा सुध्दा म्हणतात ।

 

मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दिचे कारण ।।

 गीता सांगते मनुष्य हया त्रिगुणांत बांधलेला असून मन हे रजोगुणी असून ते सदैव विषय चिंतनात गढलेले असते दैनंदिन जीवनांत मनाचे स्थान फार मोठे आहे. बाहेरुन विषय बुध्दी पुरविणे व बुध्दीने घेतलेले निर्णय पुन्हा संबंधीत अवयवांना पुढील कार्यवाही करिता सांगणे असे दुहेरी कार्य मन सदैव करते. मनाचे सर्व कार्य रजोगुणाचे भरवंशावर चालते हा रजोगुण जर कमी केला तर मन सत्वगुणी होईल त्यामुळे मनाचे विषय -चिंतन संपेल परिणामतः मनाचे बुध्दीला विषय पुरविणे बंद होईल अशी स्थीर बुध्दीच अध्यात्माला उपयोगी असते.  बुध्दी स्थीर झाली की पुढे सर्व सोपे आहे.  आणि म्हणूनच समर्थ सुध्दा । बुध्दी दे रघुनायका ।। अशी कळवळीची विनंती रामरायाला करतात बुध्दी स्थीर झाली की जीवनाला उसंत मिळते.  तो स्वरुपाचा विचार करुन जीवाचा शिव होतो.समाजांत राहूनच मनुष्य आपली सर्वांगीण प्रगती करु शकतो पण समाज धारणेसाठी शौर्य, धैर्य व सावधपणाची आवश्यकता असते हाच विचार करुन समर्थ केवळ समाजकारणावरच थांबले नसून राजकारणाला सुध्दा मुभा दिली आहे.

। मुख्य हरीकथा निरुपण । दुसरें ते राजकारण ।

। तिसरे ते सावधपण । सर्वांविषयी ।। दासबोध 11.5

राजकारणाची मुभा देतांना स्वराज्य व सुराज्य त्यांच्या डोळयासमोर होते.  अध्यात्मा करीतां वरील दोन्ही गोष्टी पुरक ठरतात.  सुस्थितीतील राज्य असेल तरच परमार्थ निर्धोकपणे करता येईल. तेव्हा वरील सर्व गुण हे गीता -धर्माचा अंगिकार केल्यानेच अंगी बाणता येतात. त्यामुळे मनुष्य जीवनाचे हीतच होते.  आपल्याला शुभेच्छा लाभून जीवनाचे कल्याणच होईल.  अन्यथा अशुभ चिंतनात अकल्याणच होईल.  कारण मन सदैव अशुभ विचारात गुंतलेले असते असे म्हटले जाते की मन चिंती ते वैरी न चिंती ।।  असे वासनेने बरबटलेले मन नेहमी वासनेच्या तडयाख्यात सापडलेले असल्यामुळे त्याला आपल्या अकल्याणाची सुध्दा चिंता वाटत नाही.  ज्याप्रमाणे एखाद्या बेडकाला सापाने तोंडात पकडलेले असतांना सुध्दा ते आपली जीभ बाहेर काढून लांब करुन काही मिळते, का खायला?  याच विचारात रत असते. मनुष्याचे सुध्दा तसेच असते.  अगदी मरणाचे दारी असेल तरी सुध्दा मन प्रपंचातून निघतच नाही.  खरे तर ही वेळ ईश चितंनाची असते.  पण जन्मभर हरी स्मरण केलेच नाही तर एकदम शेवटी त्याचे स्मरण कसे होणार? पण गीतेतील उपदेश अंगी बाणला तर यातून त्वरीत सुटका होऊ शकते. मनुष्याला लाभलेल्या या अत्यंत श्रेष्ठ अशा देहाचे सार्थक होऊ  शकते. कारण हयांच देहात आपल्या निर्मात्याची ओळख करुन घेण्याची व्यवस्था आहे.  इतर सर्व योनी हया भोग योनी आहेत म्हणून भगवंताची, ज्ञानाची, मोक्षाची, प्रकाशाची प्राप्ती करुन घ्यावी. अन्यथा आपल्या सारखे पापी आपणच ठरुं पाण्याची वा पातक्याची व्याख्या करताना समर्थ म्हणतात,

ज्याने संसारी घातले। अवघे ब्रम्हांड निर्माण केले

त्यांसी नाही ओळखिले । तोचि पतित ।।

 म्हणूनच ईश्वराची वा ज्ञानाची प्राप्ती हया जन्मांत निश्चित करुन घ्यावी. त्या करीता फार काही करावे लागते असे काहीच नाही. केवळ गीतोपदेश अंगी बाळगा गीता सांगते जे काही घडत आहे ते भगवंताचे मर्जी नुसार घडत आहे, आपले प्रारब्ध संचितानुसार घडत आहे.  त्याची चिंता करु नका.  असे जर आपण वागलो तर कितीही वाईट घटना जीवनांत घडल्या तरी आपण दुःखी होणार नाही, अथवा सुखद घटना घडल्या तरी हुरळून जाणार नाही म्हणजेच मनाचा समतोलपणा ढळू न देणे हाच खरा जीवनांतील पुरुषार्थ होय. तेच गीता सांगते की कोणत्या कर्माकडे समतोल दृष्टीने पाहिले असता, कर्मापासून निर्माण होणाऱ्या पाप-पुण्याने आपण लिंपीत होत नाही.

 

          सुख दुःख समेकृत्वा लाभा-लाभौ जयजयौ।

          ततो युध्दाय युजस्व नैवं पापमवापस्यसि ।।

म्हणजेच सुख दुःखाची तमा बाळगली नाही तर सुख-दुःख का रहाणार नाही त्यामुळे

         

आयुष्यातील सुख दुःखाची मजशी का बाधा।

          जीवन नामक यज्ञातील या दोन्ही समिधा ।।

असे होईल.

          अशा प्रकारे सुख दुःखाच्या पलिकडील जीवन तो जगू लागेल व कर्माचे कर्तेपण स्वतःकडे घेणार नाही.  त्याच्या वृत्तीत पुढील बदल होईल.

 

          आहे तितुके देवाचे । ऐसे वर्तने निश्चयाचे ।

          मूळ तूटे उद्वेगाचे । येणे रीती ।।

 

 

पंरतु मनुष्य अहंकारामुळे कर्माचे श्रेय देवाला देण्यास तयार होत नाही. माणसाचा अहंकारच त्याला गोत्यांत आणत असतो कर्माचे श्रेय स्वतःकडे घेतल्यामुळे तो कर्मबंधनात अडकतो व जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. शंकराचार्याचे शब्दात

 

          पुनरपि जननं पुनरपि मरणं।

          पुनरपि जननी जठरे शयनम्‌।।

 यास्तव गीता धर्म सांगतो की कोणत्याही कर्माचे श्रेय आपणाकडे घेऊ  नका; अहंकार बाळगू नका. कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते.  अशिक्षित, अडाणी असेल त्यानी असा गर्व धरला तर एकदा वेळ चालून जाईल.  पण स्वतःला ज्ञानी समजणाऱ्याने मात्र मुळीच गर्व धरु नये. त्याबाबत ज्ञानदेव म्हणतात.

नवल अहंकाराचे गोठी। विशेष न लगे अज्ञानाचे पाठी।

सज्ञानाचे  झोंबे कंठी। नाना संकटी नाचवित असे।।

 

म्हणून गर्व कधी धरु नये. सर्व श्रेय भगवंताला देऊन मोकळे व्हावे सर्व दैवाधीन आहे.  11 व्या अध्यायात भगवंतांनी आपले विराट रुप अर्जुनाला दाखवून त्याचा गर्व नाहीसा केला.  अर्जुन समजत होता की, मी या आपल्या भीष्म पीतामह, गुरु द्रोणाचार्य, कृष्णाचार्य व सर्व कौरवांना मारणार व पापाचा धनी होणार म्हणून त्याला दाखवून दिले की तू कोण मारणारा? तू केवळ निमित्त मात्र आहेस, खरे तर मीच (म्हणजे भगवंतानीच) त्यांना आधीच मारुन टाकलेले असून तुला त्याचे निमित्त बनायचे आहे.

अशी ही गीतेची शिकवणूक आपल्याला अनर्थापासून वाचवून परमार्थाकडे नेते.  तुकोबा तर स्पष्टच सांगतात की,

वृक्षाचेही पान हाले। ज्याचिया सते।

राहीली मग अहंता । कोठे।।

म्हणून अहंकार रहीत होऊन केवळ भगवंतालाच अनन्य शरण जावे. हे सदैव लक्षात ठेवावे की गीता हे आचरणाचे शास्त्र असून त्या शिकवणी प्रमाणेच आचरण करायला हवे. ज्ञानदेव तर गीतेला ” संसार जीणेते शास्त्र ‘ असेच संबोधतात म्हणून ती आचरणात आणायला हवी.याबाबत पांडुरंग शास्त्री आठवले, लिहीतात

गीता ज्ञानामृत संजिवन। पीता मन टाकी दुबळेपणा।।

प्रभुचरणी मन अर्पुनि होते। मनुजाचा उध्दार।।

दूध व पाणी एकत्र केले तर दोन्ही एकमेकांत एकरुप होतात; नंतर त्यांना वेगळे करणे शक्य नाही.  पंरतु त्याला विरजण लावून दही केले ते घुसळुन ताक केले व त्यातून लोणी काढले व ते लोणी जर पाण्यात टाकले तर ते पाण्याशी कालत्रयी एकरुप होणार नाही. त्याचप्रमाणे आपले मन हे दूधासारखेच आहे ते प्रपंचरुपी पाण्यात मिसळते व सहजासहजी एकरुप होते.  पंरतु ज्याप्रमाणे दूधावर प्रक्रिया करुन लोण्याच्या रुपात प्राप्त होते तेव्हा ते असे होते की त्याच्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. तसेच मनाचे संस्कार रुपी रवीने मंथन केले तर ते सुध्दा आपल्या ताब्यात येते प्रपंचरुपी पाण्यात ते कधीच समरस होत नाही असे मनावर संस्कार करण्याचे कार्य केवळ गीता धर्मच करु शकते यात तीळमात्र शंका नाही.  म्हणूनच गीता धर्म नित्य नूतनच असून सद्यः परिस्थीतीत सुध्दा योग्य तो परिणाम घडवू शकतो हे निर्विवाद असून,  त्रिकालाबाधीत सत्य आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे (हरी ॐ तसत्‌) मनुष्याने जीवंत असेपर्यंत जीवन म्हणजे काय हे जाणून घेऊन त्या मागील सत्यतत्व आत्मसात करुन त्याच्याशी एकरुप होणे हीच मानव जीवनाची सार्थकता आहे तसेच मृत्युला सामोरे जाता झाले पाहिजे तेव्हा ईश चितंनाची सवय असावी.  तेव्हाच प्रयाण काळी प्रभू स्मरण होईल गीतेत म्हटले आहे. “अंतकाले च मामेव स्मरन्मुक्ता कलेवरम्‌’  जे अंतः काळी माझे (म्हणजे प्रभूचे) स्मरण करुन देह ठेवतात ते माझ्याशी एकरुप होतात. हीच गीतेची मानवाला दिलेली सर्वांत उपयुक्त अशी देणगी आहे.

श्री. क. वि. नाशिककर

प्रवचनकार

रेकी मास्टर, वास्तुशास्त्र सल्लगार

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *