Cart

No products in the cart.

वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून पुर्व दिशेचे महत्त्व

वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करताना आपण अष्टदिशांना महत्त्व देतो. अष्ट म्हणजे आठ या शब्दाला आपल्या भारतात अनेक दृष्टीकोनातून महत्त्व आहे.

उदा  अष्टपैलू, अष्टदिशा, अष्टगुणसंपन्न, अष्टप्रधान, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, अष्टौप्रहर, “अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ सारखे प्राचीन आशीर्वाद, अशा अनेक संकल्पनांमधून आठ या आकड्याचे महत्त्व दिसून येते. प्रमुख दिशांना ज्याप्रमाणे विशेष नाम आहे त्याच प्रमाणे उपदिशांनासुध्दा विशेष नाम(ईशान्य-आग्नेय-नैऋत्य-वायव्य) असणारा भारत हा विश्वात एकमात्र देश आहे. आपण त्या उपदिशांचे महत्त्व जाणतो. त्यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणूनच त्यांचे आपण विशेष नामाभिधान केलेले आहे. अन्यथा सर्वत्र विश्वात या उपदिशांचा उल्लेख दोन प्रमुख दिशांमधील दिशा, या पध्दतीनेच नामोल्लेख होत असतो.  उदा. ईशान्य दिशेचा उल्लेख भारताव्यतिरिक्त इतर देशात उत्तर – पूर्व मधील दिशा  अशा पध्दतीने करतात. उपदिशा म्हणजे दोन मुख्य दिशांच्या संगमातून तयार होणारी दिशा. या दिशेमध्ये दोन्ही मुख्य दिशांच्या गुणधर्माचे तिसरे मिश्रण वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिशेच्या नावातच त्या दिशेच्या प्रवृत्तीचे आकलन होते. उदा.  पूर्व म्हणजे प्रथम दर्जाची, पश्चिम म्हणजे पश्चात नंतर येणारी, उत्तर म्हणजे जिथे प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते तर दक्षिण म्हणजे द-क्षिण, हळूहळू क्षीण करणारी दिशा, ईशान्य म्हणजे ईश (देव) तत्त्वाची दिशा, आग्नेय म्हणजे अग्नितत्त्वाचे स्थान, नैॠत्य म्हणजे नैर्ऋती (राक्षस) तत्त्वाची दिशा, तर वायव्य नावातच वायु तत्वाचे स्थान निर्देश होते.

सर्वप्रथम आपण पूर्व दिशेचे महत्त्व विस्ताराने जाणून घेऊ या. तसेच इतर दिशांचे महत्त्व वास्तुसंस्कृतीच्या पुढील अंकांमध्ये पाहूया.

पूर्व दिशा

1.      दिशा – पूर्व

2.      दिशापालक – इंद्र

3.      दिशापालकाची पत्नी – शचीदेवी

4.      दिशापालकाचे पूर (नगर) – अमरावती

5.      दिशापालकाचे  वाहन – पांढरा हत्ती (ऐरावत)

6.      दिशापालकाचे आयुध(शस्त्र) – वज्रायुध

7.      अष्टलक्ष्मी – ऐश्वर्य लक्ष्मी

8.      राशी – मेष, वृषभ

9.      दिशेचा रंग – पांढरा

10.    दिशेचा ग्रहाधिपती – सूर्य

पूर्व म्हणजे प्रथम दर्जाची, उच्च दर्जाची, सर्वोत्तम पूर्व दिशा म्हणजे जेथे अंधःकाराचा नाश होतो व प्रकाशाचा प्रारंभ होतो.  संपूर्ण विश्वाला ज्ञान-प्रकाशाच्या प्रगतीची जाणीव करून देणारी दिशा म्हणजे  “पूर्व’. मानवी जीवनाच्या सर्व घडामोडींच्या प्रारंभ सकाळी सूर्योदय म्हणजे पूर्व दिशेतून सूर्याची कोवळी, आरोग्यदायी, प्रफुल्लित किरणे येण्यामुळेच होत असते. पावसाळी हवामानात जेव्हा वातावरण ढगाळलेले असते, सूर्यदर्शन होत नाही अशा वेळी संपूर्ण वातावरण व पर्यायाने मानवी जीवनात उदासीनता व मरगळ येते.

पूर्व दिशेच्या दहा प्रमुख तत्त्वांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास एक गोष्ट लक्षात येईल की ज्या दिशेचा पालक, देवांचा राजा इंद्र आहे म्हणजे ती दिशा राजधानीच्या दर्जाची आहे. या दिशेचे नगर अमरावती व वाहन ऐरावत म्हणजे वैभवसंपन्नतेचे प्रतीक त्यातून प्रदर्शित होते. तर या दिशेचे आयुध वज्र म्हणजे अत्यंत प्रभावी अस्त्र. जेव्हा इतर सर्व अस्त्रे निष्प्रभ ठरतात, त्यावेळी वापरात येण्यायोग्य अत्यंत प्रभावी अस्त्र म्हणजे “वज्र’. अष्टलक्ष्मीपैकी ऐश्वर्यलक्ष्मीचे स्थान या दिशेत आहे. म्हणजे ही दिशा धनसंपत्ती सोबत सात्विक वृत्तीमध्ये सुध्दा वाढ देते. या दिशेचा रंग पांढरा म्हणजे सकाळच्या कोवळ्या किरणांचा प्रसन्नदायी रंग, तर वैज्ञानिक परिभाषेत पांढरा रंग म्हणजे सकाळच्या कोवळ्या किरणांचा प्रसन्नतादायी रंग, तर वैज्ञानिक परिभाषेत पांढरा रंग म्हणजे सप्तरंगाचे मिश्रण. या सर्व गोष्टींचा विचार करता अत्यंत पवित्र, लाभदायी-प्रगतिकारक दिशा म्हणजे पूर्व. या दिशेची इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

पूर्व दिशेचे शुभ-अशुभ परिणाम

1)      पूर्व दिशेकडे उतार असून तेथे स्नानगृह, स्वच्छता असल्यास शरीरसुख आरोग्यलाभ, राजकीय लाभ, उत्साह, अधिकार प्राप्त होतो.

2)      घराच्या जागेचा अथवा घराच्या खोल्या, व्हरांडा यांचा उतार पूर्व दिशेला असल्यास ऐश्वर्य, राजयोगप्राप्ती व बुध्दीची वाढ होते.

3)      पूर्व भागात अधिक रिकामी जागा सोडल्यास धनवृध्दी, अपत्य प्राप्ती इष्ट प्रकारे होते.

4)      पूर्व भागात तलाव, पुष्करणी असल्यास पुत्रसंतानवृध्दी.

5)      पूर्व दिशेची भिंत कमी उंचीची बांधल्यास उच्च दर्जाची प्राप्ती मिळते.

6)      पूर्व भागात उतारावर विहीर असल्यास धनधान्यवृध्दी.

7)      पूर्व दिशेला पायऱ्या गर्भगृहापेक्षा खाली असल्यास समाधान, शांती, धनवृध्दी होते.

8)      पूर्व दिशेला व्हरांडा पोर्च ठेवून घर बांधल्यास उच्च दर्जाची प्राप्ती मिळते.

9)      आपल्या प्लॉटच्या पूर्वेस मोकळी जागा असणे शुभ असते. त्यात उतार पूर्वेकडे असल्यास अधिक उत्तम.

10)    पूर्व दिशेकडे रिकामी जागा सोडून घर बांधावे व ती जागा पश्चिम दिशेकडील मोकळ्या जागेपेक्षा अधिक असावी.

11)    पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेकडे उघडणारे लॉकर अथवा कोषागार उत्तम असते.

12)    एका घरात दोन भावांनी वेगळे राहणे झाल्यास लहान भावाने पूर्व भागात तर मोठ्या भावाने पश्चिम भागात राहणे शुभ असते.

13)    प्रत्येक घरातील पूर्वभाग श्रेष्ठ म्हणून पूर्व भागात राहणारे चांगल्या स्थितीत असतात.

14)    एकाच प्लॉटमध्ये एकाच घराण्यातील दोन कुटुंबे राहत असतील तर दोघांची प्रवेशद्वारे वेगळी असावीत व त्याच्या वैयक्तिक घराच्या पूर्व दिशेत असावीत.

15)    पूर्व, ईशान्य व उत्तर भागात स्वयंपाकघर, शौचालय अथवा कट्‌ आल्यास आरोग्यनाश, धननाश व शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येतो.

16)    पूर्व दिशा आग्नेय, दक्षिण, पश्चिम, नैॠत्य, वायव्य या दिशांपेक्षा उंच असल्यास तसेच त्या दिशेस संडास, कचराकुंडी, दगड-गोटे असल्यास अधिकारभ्रष्टता, नेत्ररोग, हृदयविकार, रक्तविकार, उष्णज्वर, शिरोरोग इत्यादी होतात.

17)    पूर्व भाग उंच असल्यास संताननाश, घरातील पुरूषांना आरोग्याच्या गंभीर तक्रारी सतावतात तसेच धनाचा अपव्यय होतो.

18)    पूर्व भागात स्वयंपाक घर केल्याने धनधान्यहानी, असाध्य रोग होतात.

19)    पूर्व भागात संडास असल्यास मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येतात .

20)    पूर्व भागात पूजाघर असल्यास शुभ असते.

थोडक्यात म्हणजे, पूर्व भागात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष म्हणजे स्वयंपाकघर, शौचालय, कट्‌, उंचवटा, उंचावर जाणारा जिना अथवा पायऱ्या, उंच भिंती इतर दिशेच्या तुलनेत कमी मोकळी जागा असल्यास, त्या ठिकाणी उत्पन्नात घट व शैक्षणिक प्रगतीमध्ये आघात व आरोग्यनाश होतो.

वास्तुशास्त्रतज्ञ

डॉ. रविराज अहिरराव (पीएच.डी)

Recent Posts

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *