Cart

No products in the cart.

भारतीय संस्कृतीत गौपूजा

भारतीय संस्कृतीत परंपरेनुसार गायीस मातेचा सन्मान दिला गेला आहे. गाय संपूर्ण विश्वाचीच माता आहे. “अपितु गावो विश्वस्य मातर:’. गायीमध्ये 33 कोटी देव वास्तव्य करतात अशी हिंदू धर्माची धारणा आहे. त्यामुळे गायीची पूजा केल्याने 33 कोटी देवांच्या पूजनाचे पुण्य मिळते. “माता सर्वभूतानाम्‌ गाव: सर्व सुखप्रदा:’. गाय ही सर्व प्राणीमात्रांची माता असून, ती आपल्या लेकरांना सर्वप्रकारचे सुख प्रदान करते असेही मानले गेले आहे.          

गायीचे धार्मिक, सांस्कृतिक महत्व

ॠग्वेदात गायीस “अघन्या’ असे म्हटले आहे. यजुर्वेदात “गो:माता न विद्यते’अर्थात गो अनुपमेय आहे. अथर्ववेदात गायीस “धेनु:सदनम्‌ रमीणम्‌’ अर्थात गाय ही संपत्तीचे घर आहे असे म्हणतात.

असे मानले जाते की अमृतपानानंतर ब्रम्हदेवांच्या मुखातून जो फेस पाझरला त्यापासून गायींची उत्पती झाली तसेच गायीच्या दुधापासून क्षीरसागर तयार झाला. स्वर्गातील गाय अर्थात कामधेनु हिची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली. यावर ब्रम्हाण्ड  पुराणात देवऋ षी व्यास यांनी गो सावित्री स्तोत्रात म्हटले आहे की गाय ही साक्षात भगवान विष्णूचेच रूप आहे. तिच्या संपूर्ण शरीरात भगवान श्रीकृष्ण वास करून राहिलेले आहेत. पद्मपुराणातील कथनानुसार चारही वेद गौमुखात विराजमान आहेत. स्कन्दपुराणातही गायीस सर्वदेवमयी व वेद सर्वगोमय असे वर्णन आहे. केवळ मनुष्यच नाही तर देवीदेवताही गायीची स्तुती करतानाचे दाखले शास्रात आहेत. त्रिदेव ब्रम्हा-विष्णु-महेश कामधेनुची स्तुती अशाप्रकारे करतात.

“त्वं माता सर्वदेवानां त्वं च मातस्य कारणम्‌।

त्वं तीर्थानां नमस्तेऽस्तु सदानघे।

भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गोचरणातूनच सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. पुढे या ज्ञानातूनच गीतेसारख्या संसारोद्धार करणाऱ्या महान गं्रथांची निर्मिती झाली. भगवान श्रीकृष्णांना गोसेवा अतिप्रिय आहे. अन्य कुठल्याही सेवेपेक्षा गोसेवेने श्रीकृष्ण भगवान शीघ्र प्रसन्न होतात. गायीचे महत्व इतकेच मर्यादित नसून भगवान शंकरांच्या मंदिरांमध्ये असलेली नंदीची मूर्ती तसेच प्राचीन नाणी, पिरॅमिड यावर बैलांची मुद्रा अंकित असणे यातूनही हे महत्व स्पष्ट झालेले आहे.

गाय हे मातृत्वाचे, ममत्वाचे प्रतीक असल्याने गाय व तिच्या पाडसाची पूजा करतात. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने, खेडयापाडयातील शेतकरी कुटुंब ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे गाय ही त्यांच्यासाठी वरदानच ठरते. यासाठीच गायीला देवताचा दर्जा दिलेला असून विविध सण-वार, व्रते इत्यादीतून गायीचे पान वाढणे वगैरे पद्धतीतून तिचे देवत्व अधोरेखित केले गेले आहे. नारळाला जसे कल्पवृक्ष म्हणून संबोधिले जाते तसेच गायीला देखील कामधेनू म्हटले जाते. गायीच्या डोळयात अपार करूणा दाटलेली असते, वात्सल्य व मायेचा स्त्रोत असलेली ही गोमाता अवघ्या विश्वाचीच माता आहे यास दुमत नाही. गौपूजेची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आणि चालत राहील. आपली सांस्कृतिक संपन्नता आणि प्रगतीचे गाय हे द्योतक आहे.

Leave a Comment!

Leave a Comment!

Your email address will not be published. Required fields are marked *